
भारतातील अलाहाबाद, उज्जैन, हरिद्वार व नाशिक येथे दर बारा वर्षांनी
कुंभमेळा भरतो. नाशिक येथे सिंहस्थ पर्वात भरणार्या कुंभमेळ्यामध्ये गोदावरी नदीत
स्नान करण्यासाठी श्रद्धाळू भाविक प्रचंड संख्येने गर्दी करतात. नाशिक जिल्ह्यात
साजर्या होणार्या धार्मिक उत्सवांपैकी हा सर्वात महत्त्वाचा व भव्य धार्मिक
उत्सव! हा उत्सव १२ वर्षांनी एकदा साजरा होतो. नाशिक कुंभमेळ्याला धार्मिक
मेळाव्यांमध्ये सर्वात पवित्र मेळावा म्हणून मान्यता प्राप्त झाली आहे. हा केवळ
जिल्ह्यापुरता उत्सव नसून राष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रसिद्ध पावलेला
उत्सव आहे.
राक्षसांपासून अमृततीर्थाचे रक्षण करण्यासाठी
सर्व देव पृथ्वीवर १२ दिवस वास्तव्य करून होते. देवतांचे १२ दिवस म्हणजे
मानवाची १२ वर्षे, आणि म्हणूनच सिंहस्थ कुंभमेळा १२ वर्षांनी
साजरा केला जातो. ह्या अमृततीर्थाचे चार थेंब ज्या ठिकाणी पडले होते, अशा चार ठिकाणी हा मेळा भरतो. या मेळ्यात लाखोंनी भक्त सहभागी होतात.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जेथे मंदिर
प्रवेशासाठी सत्याग्रह केला होता, ते काळाराम मंदिर नाशिक येथेच असून येथील
नारोशंकर मंदिर, कपालेश्वर मंदिर, पंचवटी,
सीताकुंड, तपोवन ही स्थळे धार्मिकदृष्ट्या
महत्त्वाची आहेत. येथून जवळच असलेली पांडव लेणीही प्रसिद्ध आहेत.
नाशिक-मुंबई रस्त्यावर नव्याने
निर्माण करण्यात आलेले बुध्द विहार बौध्द बांधवांचे श्रध्दास्थान आहे.
त्र्यंबकेश्वर हे गोदावरी नदीचे उगम स्थान व
बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक गणले जाणारे हे ठिकाण असून महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे.
ज्योतिर्लिंगावर ब्रह्मा, विष्णू व महेश या तिन्ही देवांच्या प्रतिमा
हे येथील शिवलिंगाचे वैशिष्ट्य आहे.हे मंदिर ब्रह्मगिरी पर्वताच्या पायथ्याशी असून
उत्कृष्ट शिल्प व स्थापत्यकलेसाठी प्रसिद्ध आहे.
सप्तशृंग गड: कळवण तालुक्यातील वणी येथे
देवीच्या साडेतीन पीठांपैकी अर्ध्या पीठाचे हे महत्त्वाचे स्थान आहे. सप्तशृंगी
देवीला महाकाली, महालक्ष्मी व महासरस्वतीचे ओंकाररूप समजले
जाते. सह्याद्रीच्या या उंच कड्यास सात शिखरे आहेत म्हणून या स्थानाचे नाव
सप्तशृंग! हा गड १४१६ मी. उंच असून येथील परिसर अत्यंत रमणीय आहे.
जिल्ह्यातील मालेगाव हे शहर मोसम नदीच्या
किनार्यावर वसले असून पेशव्यांचे सरदार नारोशंकर यांनी बांधलेला भुईकोट किल्ला येथे
आहे.
येवला येथून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपला
धर्मांतराचा निर्णय जाहीर केला. तात्या टोपेंसारख्या स्वातंत्र्यसेनानीचे हे
जन्मगाव होय. याशिवाय भगूर हे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे
जन्मस्थान नाशिक तालुक्यात आहे. नांदूर-मध्मेश्वर हे गोदावरी व कादवा या नद्यांच्या
संगमाजवळ वसलेले अभयारण्य ‘महाराष्ट्राचे भरतपूर’ म्हणून ओळखले जाते. (भरतपूर
हे राजस्थानमधील प्रसिद्ध अभयारण्य आहे.) १०,००० हेक्टरवर
पसरलेल्या ह्या अभयारण्यात पक्ष्यांच्या २२० प्रजाती, वनस्पतींच्या
४०० प्रजाती व माश्यांच्या २४ प्रजाती आढळतात.
सिन्नर येथे श्री गोंदेश्वराचे प्राचीन
हेमाडपंती देवालय आहे. तसेच येथील भैरवनाथ मंदिरात प्रचंड गणेशमूर्ती आहे. येथे
देवीची बारा मंदिरे आहेत. याशिवाय येथे भारतातील पहिले खाजगी विमानतळही आहे. उपरोक्त स्थानांबरोबरच नाशिक तालुक्यातील म्हसरुळ येथील जैन लेणी, सीमेवरील सापुतार्याचे जंगल, सोमेश्र्वर येथील
दुग्धस्थळी धबधबा, चांदवड येथील किल्ला ही इतर पर्यटन स्थळे
जिल्ह्यात आहेत.
No comments:
Post a Comment